कोल्हापूर : यावर्षी जून व जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीसाठी कोल्हापूर, सांगली व धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाने नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. या तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना ८८ लाख ९६ हजार रुपयांचा निधी वन व महसूल विभागाने एका शासननिर्णयाद्वारे मंजूर केलेला आहे.
अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात राज्य शासनाकडून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीकडून मदत देण्यात येते. त्यासाठी केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्तींव्यतिरिक्त राज्य शासनाने जानेवारी २०१४ अन्वये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्यांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे. तसेच २२ जून २३ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे. खरीप हंगाम २०२५ व पुढील कालावधीकरिता केंद्र व राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीबाबत द्यावयाचे निविष्ठा अनुदानाचे दर व निकष शासनाने निश्चित केलेले आहेत.
त्यानुसार या वर्षीच्या जून व जुलै या कालावधीत राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागातील धाराशिव आणि पुणे विभागातील कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात आज निर्णय घेतला आहे. त्यानुसार या तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना ८८ लाख ९६ हजार रुपयांच्या निधीस शासनाने मंजुरी दिली आहे.
हा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट वितरित केला जाणार आहे. त्यासाठी शासनाने एका हंगामात एका वेळेस नुकसानभरपाई हा निकष ठेवलेला आहे. मदत देताना लाभार्थ्यांना अडचण होणार नाही याची तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी, असे म्हटलेले आहे.
शासननिर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोर पालन करण्यात यावे. मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरिता विहित केलेल्या अटी-शर्तींची पूर्तता होत असल्याची खात्री करण्यात यावी. शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्य वसुलीसाठी सक्ती करू नये, याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांना सूचना निर्गमित कराव्यात, असे या शासनाच्या आदेशात म्हटलेले आहे. यामुळे आता तिन्ही जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.